राज्याच्या अनेक भागात मार्च महिन्याच्या अखेरीस अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठा तडाखा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि आंबा-मोसंबीच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

मात्र, शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या रब्बी हंगामाचा Pik Vima (पीक विमा) काढलेला असेल, तर हताश होऊ नका. शासन आणि विमा कंपन्यांच्या नियमांनुसार तुम्हाला हक्काची नुकसानभरपाई मिळू शकते. पण, ही भरपाई मिळवण्यासाठी तुम्हाला नुकसानीची माहिती वेळेत देणे अत्यंत गरजेचे आहे. यात थोडाही उशीर झाला, तर तुमचे हजारो रुपये बुडू शकतात.
७२ तासांची अत्यंत महत्त्वाची ‘डेडलाईन’
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या (PMFBY) मार्गदर्शक सूचनांनुसार, नैसर्गिक आपत्तीमुळे (अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ) पिकांचे नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांनी नुकसानीच्या घटनेपासून ७२ तासांच्या आत विमा कंपनीला पूर्वसूचना (Intimation) देणे बंधनकारक आहे. तुम्ही वेळेत ही माहिती न दिल्यास,h विमा कंपनी तुमचा क्लेम (Claim) नाकारू शकते. त्यामुळे नुकसान झाल्याचे दिसताच सर्वात आधी तक्रार नोंदवा.
‘पीक विमा’ (Pik Vima) क्लेम करण्यासाठी तक्रार कशी नोंदवावी?
तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला कुठेही हेलपाटे मारण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून पुढील तीनपैकी कोणत्याही एका पद्धतीने माहिती देऊ शकता:
१. ‘Crop Insurance’ ॲपद्वारे (सर्वात सोपा आणि जलद मार्ग):
- तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून Crop Insurance हे सरकारी ॲप डाऊनलोड करा.
- ॲप उघडून ‘Continue without login’ वर क्लिक करा.
- त्यानंतर ‘Crop Loss’ (पीक नुकसान) या पर्यायावर जा.
- तुमचा मोबाईल क्रमांक टाकून OTP द्वारे पडताळणी करा.
- हंगाम (रब्बी २०२५-२६), वर्ष आणि राज्याची निवड करा.
- तुमचा पीक विमा अर्ज क्रमांक (Application Number) टाकून नुकसानीची सविस्तर माहिती भरा.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शेतात उभे राहून नुकसान झालेल्या पिकाचा फोटो किंवा व्हिडीओ काढा आणि तो ॲपवर अपलोड करा.
२. टोल-फ्री क्रमांकावर कॉल करून: तुमच्या जिल्ह्यासाठी नेमून दिलेल्या विमा कंपनीच्या अधिकृत टोल-फ्री (Toll-Free) क्रमांकावर कॉल करून तुम्ही नुकसानीची पूर्वसूचना देऊ शकता. कॉल करताना तुमचा विमा पावती क्रमांक आणि गट नंबर सोबत ठेवा.
३. कृषी विभागाशी संपर्क: जर तुम्हाला मोबाईल ॲप वापरण्यात अडचण येत असेल, तर तात्काळ तुमच्या गावचे कृषी सहाय्यक, तलाठी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन लेखी अर्ज द्या.
या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा:
- नुकसानीचा फोटो काढताना तुमच्या मोबाईलचे GPS (लोकेशन) चालू ठेवा, जेणेकरून फोटो नेमका कोणत्या शेतात काढला आहे, हे विमा कंपनीला समजेल.
- नुकसानीची टक्केवारी आणि नेमके कारण (उदा. गारपीट किंवा अतिवृष्टी) अचूक नमूद करा.
- तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला एक तक्रार क्रमांक (Docket Number) मिळेल. तो क्रमांक जपून ठेवा, भविष्यात क्लेमचे स्टेटस तपासण्यासाठी तो कामी येईल.
संकटाची वेळ असली तरीही शांत डोक्यानं ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करा. तुमची एक छोटीशी तत्परता तुम्हाला तुमच्या हक्काचा Pik Vima मिळवून देऊ शकते. ही माहिती तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांचेही नुकसान टळेल.
marathi bigg boss
सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

